आज विश्वभरात पाश्चात्य संगीतसंस्कृती ही एक प्रधान आणि प्रमाण संगीतसंस्कृती म्हणून संचरत आहे, अर्थातच या संगीतपद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करणे हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच पाश्चात्य संगीताचा हा संज्ञाकोश मराठीत निर्माण होणे महत्त्वाचे आहे. हा संज्ञाकोश असल्याने यात पाश्चात्य संगीताच्या संदर्भातील संकल्पना, संगीतप्रकार, त्याचे प्रतित्युविशेष, वाद्यशास्त्र, संगीतलेखन इत्यादी विषयांच्या अनुषंगाने प्रचलित असणाऱ्या इंग्लिशसह ग्रीक, लॅटिन, इटालियन, फ्रेंच, जर्मन व अन्य भाषांतील संज्ञांचा परामर्श घेतला आहे.कोशाच्या आरंभी पाश्चात्य संगीताचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. मराठी संज्ञांसाठी समांतर अर्थाच्या पाश्चिमात्य संज्ञांची अकारविल्हे सूचीही शेवटी दिली आहे. आकृती, तक्ते आणि छायाचित्रे यांच्या समावेशाने या संज्ञा समजून घेणे सुकर झाले आहे.
पाश्चात्य स्वरसप्तक, श्रेणी व्यवस्था, लयताल, मोनोफोनीपॉलिफोनी, मेलडीहार्मनी, काऊंटर पॉईंट, केडन्स अशा संकल्पना, नानविध वाद्यवर्ग व वाद्यमेळ, आवाजाचे वर्ग व वापर, संगीतरचना, संगीतघाट, विस्तारक्रिया, नोटेशन, सांगीत ध्वनिशास्त्र, सांगीत सौन्दर्यशास्त्र, चर्चसंगीत, सिम्फनी, सोनाटा, ऑपरा असे अनेक संगीत आविष्कार, नृत्यसंगीत प्रकार, काव्य व छंदविचार, लोकसंगीत, इथ्नोम्यूझिकॉलजी, संगीत व्यवसाय व व्यवसायिक, यंत्रसंगीत व ग्रामोफोन, पाश्चात्य संगीतातील ‘इझम्स’ अशा अनेक विषयांवर तपशीलवार नोंदी असलेला हा कोश पाश्चात्य संगीत पद्धतीचे व्यापक विश्व विद्यार्थ्यांसमोर उभे करतो. पाश्चात्य संगीताच्या अभ्यासकांसाठीच नव्हे तर एकंदर संगीताबाबत जिज्ञासा असणाऱ्या साऱ्या वाचकांस हा कोश उपयुक्त आहे.